धुळे - इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि कुटुंबाचे पाठबळ असेल तर मनुष्य आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो. शहरातील महिला उद्योजिका सुनीता महाजन यांनी याचाच पायंडा घालून दिला आहे. कामाची लाज न बाळगता काम केल्यास तुम्हाला कोणीही रोखु शकत नाही, असा कानमंत्र त्यांनी दिली.
शहरातील यशस्वी महिला उद्योजिका सुनीता महाजन यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त संवाद साधला. सुनिता महाजन यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, यासाठी २००९ मध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. मात्र, सुनिता या फक्त यावर न थांबता त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हातावरच्या शेवया बनविण्याचे तंत्र आत्मसात केले. यानंतर त्यांनी शेवया बनवून त्याची विक्री सुरू केली. सुरुवातीला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांनी निश्चयाने हा व्यवसाय सुरू ठेवला. लवकरच सुनिता महाजन यांच्या हाताच्या शेवयांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली. यानंतर या शेवयांना जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. हळूहळू हा व्यवसाय वाढत गेला आणि सुनिता यांची ख्याती देखील पसरत गेली.
आज सुनिता यांच्या शेवयांना आता परदेशात देखील मागणी वाढली आहे. मुंबई, पुणे, नाशिक यासोबत अगदी दुबईपर्यंत त्यांची ख्याती पसरली असून जिल्ह्यातील एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनी बचत गटांची सुरुवात केली असून ह्या क्षेत्रात देखील त्यांनी नावलौकिक प्राप्त केले आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. मात्र, यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी, असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला. विशेष म्हणजे सुनिता यांचे शिक्षण १० वी झाले असून, आपल्याला आवड असणाऱ्या क्षेत्रात काम करण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसते, असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.