धुळे - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित -
माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडून मी काहीतरी शिकत असतो. माझे आई-वडील हे माझे पहिले गुरू आहेत. तसेच माझे काका कर्नल पंडित यांनी मला सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, काही वैद्यकीय कारणांमुळे मी सैन्यात जाऊ शकलो नाही. यानंतर माझ्या पडत्या काळात माझ्या आईवडिलांनी मला धीर दिला. त्यामुळे पडत्या काळात जो पाठिंबा देतो तोच खरा गुरू, असेही ते म्हणाले. तर स्पर्धा परीक्षा देताना माझे गुरु तसेच चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी सर हे माझे तिसरे गुरु आहेत, अशा शब्दात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच माझी पत्नी आणि माझी मुलेदेखील माझ्यासाठी गुरू आहेत.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तींकडून मी काहीतरी शिकत असतो. यामुळे प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी गुरू असते. आयुष्यात अशा आलेल्या ज्ञात-अज्ञात अनेक व्यक्तींना आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी मनापासून नमस्कार करतो, अशा भावना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केल्या.