धुळे - महानगर परिसरात प्रभाग निहाय लसीकरण केंद्र सुरू करणे व रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांना शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्ण संख्या आवाक्यात येताना दिसत नाही.
सध्या शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू आहे. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. म्हणून महानगरपालिकेच्या वतीने प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू केले तरच कोरोनाबाधितांची संख्या आवाक्यात येऊ शकते. कारण लसीकरण केंद्र सुरू झाल्यापासून महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या पाहता त्याप्रमाणावर लसीकरण झालेले नाही. तसेच महानगरपालिकेने सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये जुने जिल्हा रुग्णालय आणि हिरे मेडीकल कॉलेज येथे जी औषधे दिली जातात. त्या तुलनेत महानगरपालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये दिली जात नाहीत, त्या धर्तीवर औषधे कोव्हिड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना दिली तरच कोव्हिड सेंटरचा खऱ्या अर्थाने नागरिकांना उपयोग होऊ शकतो. आणि शहरात कोरोनाबाधितांची संख्या आवाक्यात आणून कोरोनावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तत्काळ लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
रेमडीसीवरची उपलब्धता -
गेल्या आठवड्यात महानगरपालिकेच्यावतीने 6,500 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार होते. परंतु, आठवडा उलटून गेला तरीही रेमडेसिवीर उपलब्ध झाले नाही. सध्या रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. सांगितल्याप्रमाणे 6,500 रेमडेसिवीर उपलब्ध करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हे होते उपस्थित -
धुळे महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, मनोज मोरे, संजय वाल्हे, भटू आप्पा गवळी राजेश पटवारी उपस्थित होते.