धुळे - शहरासह परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून जुन्या जिल्हा रुग्णालयात अत्यवस्थ करोनारुग्णांवर उपचार व्हावेत, त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली असून या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर झोपून घोषणाबाजी करण्यात आली.
शल्यचिकित्सकांना निवेदन
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आजमितीला करोनाबाधित रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जुन्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. महापालिकेनेही शहरात कोविड सेंटर सुरू केले आहे. मात्र, जुने जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असल्याने या ठिकाणी अत्यवस्थ रुग्ण दाखल करून घेण्यावर भर देण्यात यावा, सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, जेणेकरुन ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना शहरातच उपचार मिळणे सुलभ होईल.
वेधले गेले लक्ष
मागण्या करताना सपाच्या पदाधिकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाबाहेर रस्त्यावरच आडवे होत घोषणाबाजी केल्याने या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले.