धुळे - कोरोनाकाळात मागील लॉकडाऊनमध्ये शहराच्या विविध भागात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून लावण्यात आलेल्या बांबूंचे धुळे महापालिकेने तब्बल 95 लाख रुपये बिल काढले. हे बिल मंजुरीसाठी स्थायी समिती सभेत ठेवण्यात आले होते. मात्र, यातच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक शितल नवले यांनी केला आहे. तसेच त्यांनी सभेतच बांबू घेऊन जात आंदोलन केले आहे. यामुळे महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सत्ताधारी पक्षातील नगरसेवकाने आवाज उठवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - पुण्यात मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस; पाहा काय आहे परिस्थिती
मागील लॉकडाऊनच्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन महापालिकेने घोषित केले होते. यासाठी धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्सला ठेका देण्यात आला होता. मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे बिल तब्बल 95 लाख रुपये काढण्यात आले आहेत. प्रत्येकी 28 हजार 600 रुपये इतके बिल एका कंटेनमेंट झोनसाठी लावण्यात आले आहे. हे बिल स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असताना याला भाजपचे नगरसेवक शितल नवले यांनीच विरोध केला. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील शितल नवले यांनी केला आहे. या बिलांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शितल नवले यांनी केली आहे. जळगाव महापालिकेप्रमाणेच धुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आवाज उठवणार असल्याचे देखील नगरसेवक शितल नवले यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यात भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास आपण तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा नगरसेवक शितल नवले यांनी दिला आहे.
हेही वाचा - अवघ्या नऊ महिन्यांत अंधेरी रेल्वे स्थानकाच्या स्कायवाॅकचे काम पूर्ण
त्रयस्थ चौकशीची मागणी
कोरोना काळात निविदा काढणे शक्य नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नवलेंच्या अपक्षेमुळे बिल मंजुरीचा विषय तहकूब केला असला तरी त्रयस्थ चौकशी करून दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे, अशी मागणी शितल नवले यांनी केली आहे.
न्यायालयात दाद मागणार
महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे नगरसेवक शितल नवले यांनी सांगितले आहे.