धुळे - जिल्ह्यातील शिरुर येथे 15 दिवसांपूर्वी चार चोरांनी फिल्मी स्टाईलने फक्त तीनच मिनिटात बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोरांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना धुळे एलसीबीच्या पथकाने आपल्या तपासाची चक्रे फिरवून पंधरा दिवसात एका चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून त्याच्या हिशयात आलेली दीड लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. या चोरी संदर्भातली संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी आणखी तिघा चोरट्यांचा शोध सुरू ठेवला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरूर गावात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काही चोरट्यांकडून फिल्मी स्टाईलने एटीएम चोरी करण्यात आले होते. या चोरीमध्ये चार चोरट्यांनी चक्क तीन मिनिटांमध्ये बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम मशिनच पिकअप गाडीच्या मदतीने चोरून नेले होते. या चोरी दरम्यान एटीएम मशीनमध्ये 14 लाख रुपये या चोरट्यांनी लंपास केले होते. या एटीएम चोरीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर झाली होती. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, धुळे पोलिसांनी सतर्क होऊन मोठ्या शिताफीने आपली तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीच्या मदतीने चक्क पंधरा दिवसांच्या आत या एटीएम चोरीचा शोध लावून एका चोरट्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून दीड लाख रुपये चोरीची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. त्याच्या आणखी तीन साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.