धुळे : जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करीत मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देताना जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी : मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग्र्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने कंटेनरने समोरील दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभे असलेले प्रवासी, मजूर आणि शालेय विद्यार्थीही या अपघातात चिरडले गेले. मृतांमध्ये दोन शाळकरी मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृतांची नावे अशी : या घटनेत आत्तापर्यंत दहा जाणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी आहेत. प्रतापसिंग भीमसिंग गिरासे (वय 70 रा. पळासनेर), गीता भुरी पावरा (वय १५ रा. कोळसापाणीपाडा), बुरी सुरसिंग पावरा (वय 28, रा. कोळसापाणीपाडा), सुनिता राजेश खंडेलवाल (रा. गणपती मंदिरजवळ, पंचवटी गॅस एजन्सी, जीटीपी स्टॉप, धुळे), कन्हैयालाल बंजारा (रा. जावदा जिल्हा भीलवाडा मध्य प्रदेश), सूरपालसिंग दिवाणसिंग राजपूत (रा. बिंबाहेडा जिल्हा चितोडगड), खीरमा डेब्रा कनोजे (वय १३ रा. आंबापाणी तालुका शिरपूर), संजय जायमल पावरा (वय ३८, रा. कोळसापाणी पाडा), रितेश संजय पावरा (वय 14 रा. कोळसापाणी पाडा), दशरथ पावरा (रा. कोळसापाणी पाडा ) अशी मृतांची नावे आहेत.
जखमींची नावे अशी : या घटनेत एकूण २८ जण जखमी झाले आहेत. सुरूवातीला येथील उपजिल्हा रूग्णालयात १४ जखमीपैकी १० जणांना तातडीने अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. तसेच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सुध्दा १६ जखमींपैकी १० जणांना धुळे येथे हलविण्यात आले. एकूण २० गंभीर जखमींना धुळे येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. यात रंजत राजेश खंडेलवाल (३० धुळे), राजेश खंडेलवाल (५५ धुळे), दशरथ कमल पावरा (२२), दिनेश नारश्या पावरा, गीता पावरा (१५), ललिता रमेश पावरा, अनिता पावरा, दिपक जगन पावरा, नंदीनी पावरा (१५), अनु पावरा, ब्रिजलाल दारासिंग पावरा (३७), लाली छगन तरवले (१६), अजय पावरा (१०), निलेश पावरा (२३ बडवाणी), असलम खान (५०, नादगाव), सुमित्रा खंडू पावरा (३५ कोरशापाणी), अमरसिंग पावरा (२२ आंबापाणी), अर्जून पावरा (१३ पारश्यापाणी), हसम खान (४० मेवाड-हरियाणा), हेमराज जाधव (४२ नाशिक), शुभम खंडेलवाल (२६ धुळे), संजय राजपूत (३० खुलताबाद), १० वर्षाची बालिका असे जखमी झालेत. या घटनेत एकूण २८ जखमी झाले आहेत.
हेही वाचा - Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार