धुळे - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे भाषेवर प्रभुत्व असणारा आणि विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणारा नेता या देशाने गमावला, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केली.
अरुण जेटली यांचे शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. जेटली यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जेटली यांच्या निधनाबद्दल बोलताना धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे म्हणाले, अरुण जेटली यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. शेवटच्या 6 महिन्यात त्यांच्यावर संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या कालावधीत मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. संरक्षण खात्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांनी माझ्यासारख्या राज्यमंत्र्यावर सोपवली होती. या कालावधीत त्यांची काम करण्याची तळमळ मला जवळून पाहता आली. सभागृहातील त्यांचे भाषण ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणी असायची, अशी प्रतिक्रिया भामरे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली आहे.