धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीने शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण शिरपूर शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे घराचे छत कोसळून राजेंद्र धुडकू माळी (वय 48) व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एकीकडे संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. वर्धा येथे झालेल्या अवकाळी पावसानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी काही प्रमाणात गारपीटदेखील झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
हेही वाचा - मंदिरात धूप, कापूर जाळतो, आमच्याकडे कोरोना होणार नाही; एकवीरा देवी मंदिराच्या विश्वस्तांचा अजब दावा
या झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शिरपूर शहराजवळील पेट्रोल पंपाची पडझड झाली. वादळी वाऱ्यासह जालेल्या पावसामुळे घराचे छत अंगावर कोसळून राजेंद्र माळी या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले असून काही जखमींना उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा फटका शिवभोजन थाळीलाही, ग्राहकांची संख्या रोडावली
दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीत विद्युत पोल मोठ्या प्रमाणात कोसळले असून संपूर्ण शिरपूर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. यात लाखो रुपयांचे नुकसान झालं असून पंचनामे करून त्वरित भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे संपूर्ण शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासोबतच धुळे शहरातदेखील रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.