धुळे- शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी छापा टाकून ५० हजारांची रोख रक्कम आणि पिस्तूल जप्त केली आहे. याबाबतची तक्रार माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांकडे केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी सदर कारवाई केली.
शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी पोलिसांकडे केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, त्याठिकाणी ५० हजारांची रोख रक्कम व पिस्तूल आढळून आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. याबाबत अनिल गोटे यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित विरोधक राजवर्धन कदमबांडे यांनी आपल्याला मारण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप केला. सोबतच, मी थोडावेळ जरी उशिरा आलो असतो तर हा हल्ला माझ्यावरती होणार होता. आणि हे शस्त्र माझ्यासाठी आणले गेले होते, असा आरोप केला. दरम्यान याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा- 'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर धुळ्यातील तरुणावर गुन्हा दाखल