धुळे - कोरोना विषाणूवर (covid19) मात करत धुळे जिल्ह्यातील आणखी सात रुग्ण आज सायंकाळी आपपल्या घरी परतले. ते सर्व धुळे शहरातील आहेत. यात एका वर्षाच्या बाळासह मुलगी, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या्मुळे कोरोना विषाणूच्या आजारातून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. या रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात, तर उर्वरित 18 रुग्णांवर कोविड केअर सेंटरमधील सर्वसाधारण वॉर्डात उपचार सुरू आहेत. या विभागात दाखल सात रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची काल व आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली.
या चाचणीचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे या सात जणांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.