धुळे - निमगूळसारख्या एकाच गावात दोन दिवसात 56 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणे हे धोकेदायक आहे. आरोग्य विभागाने गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करावी. संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात यावे. महसूल, पोलीस, आरोग्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून कामगिरी बजावत कोरोना विषाणूला प्रतिबंध घालावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.
निमगूळ येथे दोन दिवसांत 56 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी आज सकाळी निमगूळ गावास भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बादल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, अपर तहसीलदार सुदाम महाजन, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र देशमुख, सरपंच बापू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण बागल, हरी कुवर आदी उपस्थित होते.
प्रतिबंधित क्षेत्र घोषित जाहीर
जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, निमगूळ गावात सॅनेटायझरची फवारणी करावी. प्रतिबंधित्माक परिणामकारक अंमलबजावणी करावी. आवश्यक औषधे, वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे. दोंडाईचा येथील कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करावे. तेथील ऑक्सिजनयुक्त बेडची तपासणी करून घ्यावी.
वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले, सर्वेक्षणासाठी गावात पाच पथके तयार केली असून प्रत्येक घराचा सर्व्हे सुरू केला आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित जाहीर करत 10 दिवसांची संचारबंदी लागू केली असून गावातील सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच गावातील पतसंस्था, बँक, दुकाने हॉटेल्स बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी दोंडाईचा येथील नगरपालिका सभागृहात बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, अपर तहसीलदार श्री. महाजन, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चंन्द्रे, डॉ. नरोटे उपस्थित होते. त्यात दोंडाईचा शहरासह परिसरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समस्या व उपाय योजना याबाबत माहिती घेऊन सूचना केल्या.