धुळे - राज्य सरकारने आजपासून (7 जून) पहिल्या टप्प्यात काही जिल्हे अनलॉक केले आहेत. त्यात धुळे शहराचाही समावेश आहे. परंतु शहरातील नागरिक बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. शासनाच्या कुठल्याच निर्बंधाचे गांभीर्याने पालन करताना दिसत नाहीत. पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असला तरीही अजून सगळे काही रुळावर आलेले नाही, याचे भान धुळेकर विसरल्याचे दिसत आहे.
'सर्व निर्बंध हटले नाहीत'
आजपासून जिल्ह्यात अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सकाळी 7 ते 5 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वच निर्बंध हटणार नसल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या जरी कमी झाली असली, तरी दुसरीकडे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात अनलॉक दरम्यान वेळेचे बंधन राहणार आहे.
बाजारपेठेत गर्दी
धुळे जिल्ह्यात अनलॉक होताच बाजारपेठेत खूप गर्दी दिसून येऊ लागली आहे. त्यात बरेच नागरिक अतिशय बेफिकीरीने फिरताना दिसत आहेत. अनेक लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही. लहान बालकांसह नागरिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.
वाहतुकीची कोंडी
शहर अनलॉक होताच नागरिकांनी बाजारात येण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील बाराफात्तर चौक, मामलेदार कचेरी चौक, जे बी रोड चौक, काराचीवाला खुंट, महानगरपालिका चौक या सारख्या मुख्य भागात आज सकाळपासून वाहतुकीची कोंडी झालेली दिसून आली.
हेही वाचा - मोदी सरकारला सत्तेची मस्ती, त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकू येत नाही - शहराध्यक्ष सचिन साठे