धुळे - मुलांचं भावविश्व घडविण्यात आईचा मोठा वाटा असल्याने नोकरी सांभाळून मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करते. यातून मुलांवर उत्तम संस्कार होऊन त्यांना आई-वडिलांचा सहवासदेखील मिळतो, अशी भावना मातृदिनाच्या निमित्ताने गौरी चिन्मय पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
10 मे हा दिवस मातृदिन अर्थात 'मदर्स डे' म्हणून साजरा केला जातो. आयपीएस अधिकारी असलेले पती, 2 लहान मुलांची आई, आणि स्पर्धा परीक्षेतून मिळालेली नोकरी या 3 पातळ्यांवर काम करणाऱ्या गौरी चिन्मय पंडित यांच्याशी मातृ दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या पत्नी गौरी पंडित ह्या नागपूर येथे आकाशवाणी केंद्रात कार्यरत आहेत. त्यांचे दिवसातले 8 तास कामाच्या ठिकाणी जातात, घरी आल्यानंतर मुलांना वेळ देत त्या त्यांच्याशी संवाद साधतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने त्या घरीच आहेत. यावेळी त्या जास्तीत जास्त वेळ मुलांना देत आहेत. आयपीएस अधिकारी असलेल्या पतीच्या कामाचा प्रचंड ताण बघता त्यांना मुलांना वेळ देणं शक्य नसल्याने आई म्हणून मुलांना समजून घेणं, त्यांना वेळ देणं आणि त्यातून त्यांचं भावविश्व घडवणं हे आव्हान असल्याचं त्या सांगतात.
आजकाल मोबाईलमुळे मुले आई-वडिलांसोबत खेळत नाहीत. मात्र, गौरी पंडित यांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवत त्यांना खेळाची, वाचनाची आवड लावली आहे. तसेच त्यांना आपली मातृभाषा अवगत व्हावी, यासाठी त्या मराठी भाषेतून संवाद साधतात. आईचं आपल्या मुलांच्या आयुष्यात वेगळं स्थान आहे. मुलं मोठी होईस्तोवर त्या महिलेला करियर घडवण्यासाठी कुटुंबाचा हातभार आणि पाठबळ मिळणं हे खूप महत्वाचे आहे. जर हे पाठबळ मिळाले तरच सर्वसामान्य कुटुंबातील महिला अधिक सक्षमपणे समाजात विविध क्षेत्रात काम करू शकतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
घरात सासू-सासरे असल्याने मुलांना आजी आजोबांचा देखील सहवास मिळतो. त्यातून विभास आणि वल्लभ या 2 लेकरांवर उत्तम संस्कार होत आहेत. एकंदरीतच स्वतःचं करियर, कुटुंब आणि 2 मुलांची आई हे सगळं सांभाळताना पतीची असणारी साथ, सासू सासऱ्यांचं पाठबळ यामुळे मी आयुष्यात काहीतरी करू शकले, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.