धुळे - शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ही समस्या लक्षात घेऊन धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक मोबाईल ॲप विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील विविध रुग्णालयातील खाटांची संख्या रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशासनाने मोबाइल ॲप विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या मोबाइल ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच सामान्य नागरिकांना हे ॲप 'प्ले स्टोअर'मधून डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपमध्ये शहरातील कोविड रुग्णालयाची माहिती त्या ठिकाणी असलेली खाटाची संख्या ऑक्सीजन खाटांची संख्या, व्हेंटिलेटर बेडची संख्या समजण्यास मदत होणार आहे. यासोबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करण्यात येते. याबाबतच्या तक्रारी वाढल्या असून खासगी रुग्णालयांच्या बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे.