धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील मोहन मराठे खून प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा मराठा समाज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याच येईल, असा इशारा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी विनायक मेटे म्हणाले, की मोहन मराठे यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. याबाबत आपण पोलीस अधिक्षक तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे मागणी केली असून कलम 302 अन्वये गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाज आंदोलन करेल, असा इशारा विनायक मेटे यांनी यावेळी दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने स्थगिती न उठवल्यास यापुढे देखील राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठा समाज होऊ देणार नाही. मराठा आरक्षणा बाबत वक्तव्य करणाऱ्या शरद पवारांनी आरक्षणासाठी नेमके काय प्रयत्न केले याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी अशीही टीका विनायक मेटे यांनी यावेळी केली. महा विकास आघाडीचे सरकार त्यांच्यात असलेल्या अंतर विरोधामुळे पडेल मात्र ते कधी पडेल याची आपण वाट पाहत असल्याचे विनायक मेटे यांनी या वेळी सांगितले.