धुळे - राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत जनतेने कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. १०५ जागा मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावात या निवडणुकीत पाहायला मिळाला. ५४ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस ही तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे काशीराम पावरा हे विजयी झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली आहे.
हेही वाचा - VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण...
पावरा म्हणाले, की जनतेने यंदाच्या निवडणुकीत विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहिलो. याहीपुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू. शिरपूर तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले.