धुळे - लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, या मतदानादरम्यान भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्र आवारात फिरत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यामध्ये धुळे लोकसभेसाठी मतदान सुरू आहे.
धुळे लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेवर आमदार गोटे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत ईटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, की भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रात सर्रासपणे फिरत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच एका मतदान केंद्रावर एक महिला भाजपच्या चिन्हांची साडी नेसून आली आणि ती महिला मतदान केंद्र आवारात मोबाईल फोन वापरत असल्याचे आढळून आले. मात्र, यावर निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत होत आहे. मात्र, या लढतीत भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनीही उमेदवारी दाखल केल्याने रंगत आली आहे.