धुळे - मणिपूर येथे कर्तव्य बजावताना गोळी लागून जखमी झालेल्या व त्यानंतर उपचार घेताना हुतात्मा झालेल्या सैन्य दलातील जवान निलेश महाजन यांच्यावर आज दुपारी बाराच्या सुमारास सोनगीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
हेही वाचा - वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर; धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
देशभक्तिपर गीत, तसेच निलेश महाजन अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम आदींच्या जयघोषात निघालेल्या अंत्ययात्रेत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, हजारो आबालवृद्ध सहभागी झाले होते. येथील ग्रामस्थांनी तब्बल २०० मीटरची राष्ट्रध्वजाची प्रतिकृती हाती घेत निलेश महाजन यांना आदरांजली वाहिली.
कळंबू येथील मूळ रहिवासी
कळंबू (ता. शहादा) येथील मूळ रहिवासी, मात्र सध्या सोनगीर येथे वास्तव्यास असलेले जवान निलेश अशोक महाजन (वय २५) हे 6 नोव्हेंबर २०२० ला मणिपूर येथे कर्तव्यावर असताना गोळी लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्कराच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. मात्र, आसाममधील गुवाहाटी येथे सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली व ते हुतात्मा झाले. शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना वीरगती प्राप्त झाली. आज सकाळी नऊ वाजून ५५ मिनिटांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून सोनगीर येथे आणण्यात आला. यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनी निलेश महाजन अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय आदी घोषणा दिल्या. सकाळी साडेदहाला सजविलेल्या ट्रॅक्टरवर निलेश यांचा मृतदेह ठेवत अंत्ययात्रेला सुरवात झाली.
प्रारंभी सैन्य दल व पोलीस दलाच्या जवानांनी त्यांना सलामी दिली. आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह शासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, हजारो नागरिक उपस्थित होते.
200 मीटर ध्वजाने वेधले लक्ष
यावेळी गावातील तरुणांनी २०० मीटर राष्ट्रध्वजाची प्रतिकृती तयार केली होती. ती हाती घेत ते पुढे चालत होते. यानंतर डीजेवर देशभक्तिपर गीतांच्या तालात अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या निलेश महाजन यांच्यावर गावातील स्वामिनारायण मंदिराजवळील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - 'अग्निशामक बंब दुरुस्त होत नाही, तोपर्यंत टोल वसुली थांबवा'