धुळे- गावठी कट्यासह काडतूस बाळगले म्हणून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तरुणाला जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वडेल गावातील वरला ते आंबा रस्त्यावर पकडले आहे. पोलिसांनी तरुणाजवळून १२ हजार रूपये किंमतीच्या कट्ट्यासह ४०० रूपयांची काडतूसे जप्त केली आहे.
गणेश सुकलाल पाटील असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यप्रदेशातील वरला या ठिकाणाहून एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन प्रवासी वाहणाने शिरपूरकडे येत असल्याची खबर तालुका पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी लागलीच वरला ते शिरपूर मार्गादरम्यान वडेल या ठिकानी नाेकबंदी केली. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वरला ते आंबा रोडवर एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता गणेश सुकलाल पाटील (रा. शास्त्री कॉलनी, सेंधवा, म.प्र.) असे या इसमाचे नाव असल्याचे उघड झाले. शिवाय त्याच्या अंगझडतीत १२ हजार रूपये किंमतीचा एक गावठी कट्टा (पिस्टल) व ४०० रूपये किंमतीचे दोन काडतुसे आढळून आलीत. पोलिसांनी हा माल जप्त केला असून गणेश पाटील याच्यावर शस्त्र कायदा ३/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहेत.
हेही वाचा- धुळ्यात शिरपूर येथून पोलिसांनी जप्त केली ५ लाखांची रोख रक्कम