धुळे - महाविकासआघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असून हे सरकार 15 वर्षे टिकेल. मात्र, आमच्या सरकारबाबत माध्यमांद्वारे समज-गैरसमज पसरले जात आहेत. याबाबत आम्ही कोणतीही चिंता करत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राजधानी दिल्ली येथे झालेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेला गृहमंत्रालय जबाबदार असून गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. त्यामनुळे या घटनेप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा... देशद्रोह खटला : 'कन्हैया कुमारने मानले केजरीवालांचे आभार', म्हणाला...'खरे काय ते जगालाही कळू द्या'
खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीचे सरकार हे पंधरा वर्षे टिकेल. विरोधकांनी त्याची चिंता करू नये. मात्र, या सरकारबद्दल अनेक समज-गैरसमज माध्यमांमधून पसरवले जात आहेत. याची आम्ही कोणतीही चिंता करत नाही, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
दिल्ली हिंसाचारातील बळींचा शहीद असा उल्लेख...
दिल्ली हिंसाचारात अनेकांचा नाहक बळी गेला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच दिल्ली हिंसाचारावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांचा उल्लेख शहीद असा केला. तसेच आपल्या वक्तव्याचे समर्थन देखील केले.