धुळे - सोनगीर- दोंडाईचा रस्त्यावर अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असलेली सुमारे 20 लाख16 हजार 720 रुपयांची दारु सोनगीर पोलिसांनी जप्त केली आहे. ही दारु गुजरातमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश पाटील यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे, शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम यांना तपासासाठी पाठविले होते.दरम्यान, पोलिस पथकाने दोंडाईचा रस्त्यावरील धनश्री हॉटेलजवळ सापळा रचला. याठिकाणी पथकाने एक संशयित ट्रक (क्र.एमएच-18-बीजी-1905) अडविला.
यावेळी ट्रकची झडती घेण्यात आली. चालकाला विचारले असता गाडीत झाडू असल्याचे सांगितले. तसेच ट्रकमधील सामानाचे बिलही पोलिसांना दाखविले. या बिलात गाडी अहमदाबाद येथे झाडू घेऊन जात असल्याचा उल्लेख होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली. यावेळी झाडूच्या गठ्ठ्यांखाली दारूचे खोके लपविलेले आढळुन आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत सुमारे 20 लाख रुपयांची दारू जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.