धुळे - जिल्ह्यातील दोंडाईचा येथे झालेल्या कंटेनर आणि बसच्या भीषण अपघातात 15 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दोंडाईचा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनरची धडक झाली. अपघातात बस चालक मुकेश पाटील यांच्यासह 15 जण जागीच ठार झाले आहेत. तर 20 प्रवासी जखमी असून पैकी 6 गंभीर आहेत. अपघातात कंटेनरची बस चालकाच्या बाजूला जोरदार धडक बसली. त्यात बसचा चक्काचूर झाला आहे.
अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठवण्यात आले आहेत. यावेळी दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी तत्काळ पंचनामे केले. तर येत्या 2 दिवसांत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.