धुळे - संपूर्ण राज्यात आणि देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले. या काळात अनेकांना 'वर्क फ्रॉम होम' मिळाले, तर काहींचा टीव्ही आणि मोबाईलचा वापर वाढला. त्यामुळे नागरिकांमध्ये डोळ्यांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी नेत्ररोग तज्ज्ञ केतकी भट यांच्याकडून माहिती घेतली...
मार्चपासून मे महिन्यापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यादरम्यान विविध कंपन्या तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले. या वर्क फ्रॉम होममुळे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. तसेच लहान मुलांचा मोबाईल आणि टीव्हीचा वापरदेखील मोठ्या प्रमाणावर वाढला. परिणामी नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या डोळ्यांच्या विकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे समोर आले आहे, असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. केतकी भट यांनी सांगितले.
डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी डोळ्यांची जास्तीत-जास्त काळजी घ्यावी. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांना आराम देणारे व्यायाम करावे, डोळ्यांसाठी पोषक असलेला आहार घ्यावा, असे आवाहन डॉ. केतकी भट यांनी नागरिकांना केले.
दरम्यान, डोळ्यांचे विकार वाढल्याने चष्मा वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नागरिक सध्या अल्ट्राव्हायलेट ग्लासची मागणी करत असल्याचे चष्मा विक्रेत्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.