धुळे - मागील १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने जे करायला हवे होते ते आम्ही करत आहोत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर केली. मला बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. धुळ्यातील प्रचार सभेत आदित्य बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्य्यात येऊन पोहचली आहे. धुळे शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा रोड शो ऐनवेळी रद्द करण्यात आला.
हेही वाचा - सावरकरांना भारतरत्न देण्याच्याआधी त्यांच्या पुतळ्याजवळचा रस्ता नीट करा - कन्हैया कुमार
मी निवडणुकीचा प्रचार करायला आलेलो नाही. नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी मला आशीर्वाद हवे आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई-पुण्याच्या धर्तीवर उच्च शिक्षण मिळावे यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत, म्हणून मी निवडणूक लढवत आहे. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त राजकरण केले. विकासाच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी हे धुळे शहरातील श्रीराम कॉलनी भागात घरोघरी जावून मतदारांची भेट घेतली. शिवसेनेला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.