धुळे - हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. यावेळी धुळे बंदचेही आवाहन करण्यात आले होते. शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ काही समाजकंटकांनी व्हायरल केला होता. याचा निषेध करण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने धुळे बंदच आवाहन करण्यात आले होते. या बंदला व्यावसायिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. या घटनेचा निषेध करत धुळे शहरातून हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील मनोहर टॉकीजपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील पाचकंदिल चौकात आल्यावर याठिकाणी हनुमान चलीसा म्हणण्यात आली.
आग्रा रोडवरील श्रीराम मंदिराजवळ आल्यावर मोर्च्याचा समारोप करण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात आली होती. या मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी. तसेच कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.