धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे परिसरात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. गावातील सबस्टेशन मध्ये पाणी शिरल्याने परिसरातील १४ गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तालुक्यात झालेल्या पावसाचा जोर भयंकर होता. या पावसामुळे ग्रामस्थांनी ढगफुटीचा अनुभव घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे, धमाने, वसमाने, कोळदे या परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस साधारणत: ३ तासांपेक्षा जास्त चालला. या पावसामुळे अर्धा तास ढगफुटीसारखा अनुभव लोकांनी घेतला. यात गावाजवळ असलेला १५ फुटी नाला तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे गावात गुडघ्याएवढे पाणी शिरले आहे.
हा नाला गावाच्या दर्शनी भागात असल्यामुळे मोठी हानी टळली आहे. मात्र, या जोरदार पावसामुळे बामणे शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावाजवळ असलेल्या नाल्यावरून पाणी वाढल्याने काही काळ बामणे-दमाने गावांचा संपर्क तुटला होता. जवळच असलेल्या सबस्टेशनमध्ये कमरे एवढे पाणी शिरल्याने सुमारे 14 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
हा पाऊस सायंकाळी झाल्यामुळे जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात शेतकऱ्यांना वेळ मिळाला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.