धुळे - गेल्या निवडणुकीत तुम्हाला ज्यांनी फसवले त्यांनाच आता तुम्ही फसवा, भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना फसवले आहे, यामुळे या निवडणुकीत तुम्हीच त्यांना फसवा, असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी दोंडाईचा येथे झालेल्या सभेत केले. काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील दोंडाईचा येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांची सभा पार पडली. या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपवर टीका केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी खूप आश्वासन दिली, मात्र ही आश्वासन पूर्ण केली नाहीत. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी तुम्हाला आश्वासन देऊन फसवलं या निवडणुकीत तुम्ही त्यांना फसवा, असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले. या सभेला धुळे जिल्ह्यातील आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.