धुळे - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासन त्याच्या पातळीवर सर्व प्रयत्न करीत आहे. मात्र, तरी देखील रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी भाजपचे नेते, नगरसेवक व कार्यकर्ते प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करत आहेत. मात्र, शिवसेनेतर्फे केवळ पत्रकबाजी, छोटोछाप कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे सत्ताधारी आता कोणत्या बिळात लपले? असा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार कोणत्या बिळात लपले हे विचारण्याची हिंमत करावी, असा टोला नागसेन बाेरसे यांनी लगावला. तर, पालकमंत्री केवळ बिर्याणी खाण्यासाठी शहरात येतात असे, शितल नवले यांनी सांगितले. यानंतर सभापती संजय जाधव यांनी विरोधकांचा निषेधाचा ठराव स्थायी सभेत पारीत केला.
विविध मुद्द्यांवरू झाले आरोप-प्रत्यारोप -
महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सभेत सभापती संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी स्थायी समितीची सभा विषय पत्रिकेवरील विषयांऐवजी शिवसेनेने काढलेल्या पत्रकावरूनच गाजली. शिवसेनेचे मनोज मोरे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी काढलेल्या पत्रकाचा महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी समाचार घेतला आहे. सदस्य अमोल मासुळे यांनी काहीही भरीव काम न करता पत्रक काढून भाजपाच्या नगरसेवकांना बदनाम करणाऱ्यांच्या निषेधांचा ठराव करावा, असे निवेदन सभापती संजय जाधव यांना दिले. यावर सत्ताधारी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री काेरोना काळात कोणत्या बिळात दडले अशी विचारणा करावी. जे असे करील त्यांचा जाहीर सत्कार करणार, असे सदस्य नागसेन बोरसे म्हणाले. जिल्ह्यातील स्थिती पाहता पालकमंत्र्यांनी मुक्काम करून प्रशासनाला मदत करणे अपेक्षित आहे. रूग्णांना लस, रेमडेसिवीर शासनाकडून उपलब्ध करून देणे गरजेचे होते. २२ मार्चपासून दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाच्या प्रोसेडींगवर पालकमंत्र्यांनी सही न केल्याने कामाचे ६ कोटी रुपये परत गेले. केवळ कमिशन न मिळाल्याने हा फंड परत गेल्याचा आरोप नागसेन बोरसे यांनी केला.
पालकमंत्री फक्त बिर्याणी खाण्यासाठी येतात -
महापालिकेला पालकमंत्र्याकडून सावत्र वागणूक मिळत आहे. नगरोत्थानचे १५ कोटी व अग्नीशामकचे १ कोटी ५० लाख रुपये परत गेले आहे. जिथे जास्त कमिशन तेथे ते फंड देतात. शहर व जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही. ते शहरात केवळ बिर्याणी खाण्यासाठीच येतात, असेही सदस्य शितल नवले यांनी सभागृहात सांगितले. काेरोना काळात भाजप त्यांच्या स्तरावर पूर्णपणे काम करत असताना शिवसेनेचा डाॅक्टर सेल काय काम करतो ते दाखवा, अशी मागणी नवले यांनी केली.
हेही वाचा - राज्यात 66 हजार 191 नव्या रुग्णांची वाढ, 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त