धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चौगांव येथील एक वर्षीय बालिका स्वाती पुजू भिल ही झोक्यातून (झोळीतून) खाली असलेल्या गरम चहाच्या भांड्यात पडली. ती एका बाजूने गंभीर भाजली. तिला शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूची शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेने शिंदखेडा तालुक्यातील चौगांव येथे हळहळ व्यक्त होत आहे. लहान मुलगी गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गरिबीतही मुलीचा चांगला सांभाळ करत होते. त्यात ही घटना घडली आहे. घटनेचा तपास शिंदखेडा पोलीस स्टेशनचे असई जी जी ठाकरे करत आहेत.