धुळे: तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ४ डिसेंबर २०२२ रोजी एका ट्रकमधून रॉकेट देशी संत्रा नाव असलेल्या दारूसह ९५ लाख ७७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि बनावट दारू तयार करण्याची साधने जप्त केली होती. त्या गुन्ह्यात सुमारे १० आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. नऊ आरोपींंवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली होती.
आरोपीवर तंत्रज्ञानाची देखरेख: या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन (रा. शिरुड ता. धुळे) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पीआय दत्तात्रय शिंदे यांनी तांत्रिक कौशल्याचा व गोपनीय माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल सुभाष महाजन, हेड कॉन्स्टेबल प्रवीण सदाशिव पाटील, पोलीस नाईक उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्या पथकाला वेळोवेळी तांत्रिक माहिती दिली. मुख्य आरोपी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन याचा शोध सुरू ठेवला होता.
अखेर आरोपीस अटक: आरोपी पुन्हा पुन्हा मोबाईल सिमकार्ड व मोबाईल बदलत असल्याने आणि त्याचा ठावठिकाणा नेपाळ, गोवा, उत्तर प्रदेश व बिहार अशा ठिकाणी दर्शवत होता. त्यामुळे तो मिळून येत नव्हता. तेव्हा पीआय दत्तात्रय शिंदे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकासह तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा २८ जून रोजी गंगाखेड जि. परभणी येथे असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार गंगाखेड शहरातील बस स्टॅन्ड जवळील जगदंबा हॉटेल जवळून त्यास ताब्यात घेतले.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता: आरोपी दिनू डॉनला धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणून नमूद गुन्ह्यात २९ जून रोजी त्याला अटक केली आहे. आरोपी दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन याच्याकडे सखोल विचारपूस केली असता तसेच त्याच्या अभिलेखाबाबत माहिती घेतली गेली. सदर आरोपीविरुद्ध धुळे जिल्ह्यात तसेच राज्यात व इतर जिल्ह्यात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. काही गुन्ह्यामध्ये तो अद्याप फरार असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
- Fake Bank Employee Arrested: बँक कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकांना लुटले, 49 गुन्हे करणाऱ्यांना अटक
- Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये विनयभंगाचे सत्र सुरू; तरूणाने अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत केला तरूणीची छेड काढण्याचा प्रयत्न
- Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कमरेला स्पर्श करून गेली