धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोनशे रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत बनावट दारूमुळे चर्चेत असलेला शिरपूर तालुका आता बनावट नोटांमुळे चर्चेत आला आहे.
शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी गुलाब बेलदार याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री, बनावट नोटा, संगणक, मोबाईल, बँकेचे पासबुक असा 48 हजार 360 रुपयांचा ऐवज आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष गुलाब बेलदार, गुलाब बाबू बेलदार, मंगल पंजाब बेलदार आणि विनोद जाधव (सर्व राहणार कळमसरे) यांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांचा छापा पडताच आरोपींनी बनावट नोटा जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.