धुळे - देशभरात कोरोनाची दुसरीलाट जोर पकडत आहे. त्याला धुळे शहर आणि जिल्हा देखील अपवाद नाही, वर्षभरापासुन कोरोनाच्या रुग्ण संख्येचा ग्राफ वाढत आहेच. तर दुसरीकडे मृतकांची संख्या देखील वाढत आहे. काेरोनाची दहशत अजुनही कायम आहे. परिणामी कोरोना मुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठीही कोणी धजावत नाही. मात्र गेल्या ३६५ दिवसांपासुन धुळे शहरात कोरोना बळींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालीकेचे तीन कर्मचारी अहारोत्र झटत आहेत. अगदीच उन, वारा, पाऊस याची देखील तमा न बाळगता कोराेना बाधीतांना हिंदु धर्म परंपरेप्रमाणे अग्नीदाहचे कर्तव्य हे तीन कर्मचारी बजावत आहेत. हे कर्तव्य बजावतांना कोणताच वेगळा इन्सेन्टीव किंवा मोबदला देखील मिळत नाही. मात्र प्रशासकीय कर्तव्यापेक्षा माणुसकीच्या भावनेतुन हे कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातलग असतील तर त्यांच्या समवेत आणि बेवारस म्हणुन मृतदेह आला, तर स्वत:च सरण रचण्यापासुन अस्ती विसर्जन पर्यंतची जबाबदारी हे तीन कर्मचारी पार पाडत आहेत.
डोक्यावर छत नाही, पिण्यासाठी पाणी नाही तरी काम सुरुच
कोरोनाच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी सामाजीक कार्यकर्ते प्रविण अग्रवाल यांनी त्यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी मुकादम,पवार आणि बैसाणे हे तीन कर्मचारी मनपाने नियुक्त केले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत या स्मशानभुमीच्या जागेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधे, पिण्यासाठी पाणीही मिळत नव्हते, ना बसण्यासाठी छत होते. माध्यमांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता मनपाने या जागेवर तात्पुरते शेड उभारले आहे. तर सामाजिक संघटनांनी या ठिकाणी विश्रामासाठी व्यवस्था केली आहे. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी बैसाणे नामक कर्मचाऱ्यांच्या पायात तर चप्पल देखील नाहीत, सध्या पायात कापड गुंडाळून हा कर्मचारी अग्नीदाहचे कर्तव्य बजावत आहे.
....आणि गहिवरुन आले
शहरातील जोशी परिवारातील दोन सदस्यांचा चार दिवसात मृत्यु झाला. त्यात आधी आई गेली, मुलांने आईच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पुर्ण केले. दोनच दिवसात वडीलही गेले, गुरुवारी वडीलांवर मुलांने अंत्यंसंस्कार केले. कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये याकरीता त्यांनी इतरांना येऊ दिले नाही. एकटेच स्मशानभुमीत दाखल झाले. मात्र या कालावधीत महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे एकटेपणा जाणवला नाही, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली.
संचारबंदी मुळे मडके ही दुरापास्त
हिंदु धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृतदेहा शेजारुन मातीच्या मडक्यात पाणी फिरवण्याची प्रथा आहे. सध्या कडक लॉकडाऊनमुळे मातीचे मडके मिळणे देखील दुरापास्त आहे. शिवाय शहरापासुन कोवीडची स्मशानभुमी लांब आहे. परिणामी ज्यांना मडके मिळाले नाही, अशा व्यक्तींना अखेरचे पाणी देण्यासाठी थेट प्लास्टीकच्या पाणी बॉटलचा वापर करुन पाणी द्यावे लागत आहे.
हेही वाचा - भारतातील कोरोनास्थिती गंभीर; पाकिस्तानने पुढे केला मदतीचा हात