धुळे : धुळे तालुक्यातील नेर गावात डुक्कर मारून प्रार्थनास्थळात फेकणाऱ्या पाच संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यात एका अल्पवयीन व्यक्तीचाही समावेश आहे. या गुन्ह्याच्या मागे एखाद्या पक्ष संघटनेचा हात आहे का किंवा कुणी मास्टरमाईंड आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी सामंजस्याने प्रकरण मिटवले : धुळे तालुक्यातील नेर गावात 2 जून रोजी रात्री ही घटना घडली होती. नेर येथे मुस्लिम धर्मियांचे पवित्र उपासना स्थान असलेल्या प्रार्थनास्थळात अज्ञात संशयतांनी मेलेले डुक्कर फेकले होते. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 295 आणि 295 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी गावात जाऊन दोन्ही समाजाची तातडीची बैठक बोलावली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गावकऱ्यांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले.
5 जणांना अटक : पोलिसांनी पुणे एमआयडीसी येथून गणेश छोटू शिरसाठ या 22 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. गणेश शिरसाठ यांने दिलेल्या माहितीच्या आधारे भीमराव सुकलाल कुवर (वय 36), विकी नाना कोळी (21), रोहित अरुण जगदाळे (21) आणि अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी गणेश शिरसाठसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अल्पवयीनाची रिमांड होम मध्ये रवानगी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या पाच जणांनी पूर्वनियोजित कट रचला होता. मुख्य संशयित भीमराव कुवर याने आधी एका डुकराला ठार मारले. त्यानंतर हे डुक्कर एका गोणीमध्ये टाकून प्रार्थनास्थळाच्या बाजूला असलेल्या किराणा दुकानाच्या गच्चीवर जाऊन प्रार्थनास्थळामध्ये फेकून दिले. जुन्या भांडणावरून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा :