धुळे - जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिकवलेला कांदा मार्केटला विकूनदेखील त्याचे अद्याप पैसे न मिळाले संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकून आंदोलन केलं.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडील कांदा विकत घेतला होता. मात्र या कांद्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी राजा संकटात सापडलेला असताना दुसरीकडे मात्र विकल्या गेलेल्या कांद्याचे पैसे हातात न पडल्याने संतप्त झालेल्या पिंपळनेर येथील शेतकऱ्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकून आंदोलन केलं.
यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला होता. कांद्याचे पैसे वेळेवर न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.