धुळे - तालुक्यातील मोरदड तांडा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांची काही समाजकंटकांनी विटंबना केली. ही घटना लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. याठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
धुळे तालुक्यातील मोरदड तांडा गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा आहे. या पुतळ्यांची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकारानंतर आंबेडकरी अनुयायांनी गावात एकच गर्दी केली. यावेळी गावात या घटनेचा निषेध करीत तणाव निर्माण झाला होता. विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोरदड तांडा गावाकडे धाव घेतली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी ग्रामस्थांना केले. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.