धुळे - शहरात नव्याने बांधण्यात आलेली शासकीय ग्रंथालयाची इमारत पूर्णत्वास आली आहे. ही वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा ग्रंथालयाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. धुळे जिल्हा ग्रंथालयाची ही वास्तू महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची वास्तू ठरणार आहे.
शहरातील नकाने रोड भागात जिल्हा ग्रंथालयाची दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. १२ हजार स्क्वेअर फूट जागेवर ही वास्तू साकारण्यात आली असून सुमारे २ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे ग्रंथालय संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे. याठिकाणी वेगवेगळी दालने असून सुसज्ज आणि अत्याधुनिक सभागृह तयार करण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या इमारतीचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मात्र, इमारतीचे नुकसान होऊ नये यासाठी १ एप्रिल पासून याठिकाणी ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. याठिकाणी अभ्यासासाठी लागणारी विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ग्रंथालयाचा परिसर निसर्गरम्य आणि शांत असल्याने वाचकांना वेगळा आनंद अनुभवता येणार आहे.