धुळे - शहरासह परिसरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना रंग लावला जातो. मात्र, यासोबत डोलचीमध्ये पाणी भरून त्याचा फटका एकमेकांना दिला जातो. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. यासाठी लागणाऱ्या डोलची बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
संपूर्ण राज्यात आणि देशात होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. खान्देशात हा सण विशेष पद्धतीने साजरा केला जातो. धुळे शहरातील होळी राज्यात प्रसिद्ध आहे. धुलिवंदनाचा सण हा होळीपासून सुरू होतो. धुलिवंदनाच्या दिवशी ठिकठिकाणी कारंज्या लावून डिजेच्या तालावर ठेका धरत एकमेकांना रंग लावत हा सण साजरा केला जातो. मात्र, यासोबत अतिशय आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे डोलचीने धूलिवंदन साजरी करणे. डोलची ही लोखंडी पत्र्यापासून तयार केली जाते.
धुळे शहरातील ही डोलची संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या डोलचीमध्ये पाणी भरून या पाण्याचे एकमेकांना फटके मारले जातात. हे फटके इतके जोरात असतात की अनेकवेळा कपडेदेखील या फटक्यांनी फाटतात. विशेष म्हणजे हा प्रकार फक्त धुळे शहरात पाहायला मिळू शकेल. धुलिवंदन सणासाठी लागणारी ही डोलची तयार करण्याचे काम शहरातील कारागिरांकडे सुरू आहे. ही डोलची तयार करण्यासाठी लागणारा पत्रा हा महाग मिळत असल्याने यंदा डोलचीचे भावदेखील वाढले आहेत. या डोलचीला आता संपूर्ण राज्यभरातून मागणी वाढली आहे.