धुळे - कोल्हापूर आणि सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येथील शिक्षक संघटना सरसावली आहे. या संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांना गृहपयोगी साहित्य देण्यात आले. या साहित्यामध्ये विविध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. यातील एका कीटमध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरदाळ, पाच किलो गव्हाचे पीठ, १ किलो गोडेतेल, पावकिलो तिखट, १ किलो साखर, २५० ग्रॅम चहापूड, दंतमंजन, खोबरेल तेल, मीठ आदी जीवनाश्यक वस्तुंची समावेश आहे.
या शिक्षक संघटनेतर्फे असे एकूण १०१ कीट तयार करण्यात आले आणि शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आवारातून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी पवार यांनीही दोन कीट पूरग्रस्तांना दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत ही मदत शिक्षक संघटनेने पूरग्रस्तांना पाठवली आहे.