धुळे - तालुक्यातील आनंद खेडे येथे तालुका पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 4 लाख 82 हजार 186 रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि प्रवीण पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. यात संघमा चौक येथे राहणारा विशाल वाघ, अनिल राजेंद्र पवार या दोन व्यक्ती आनंद खेडा ते उडाणे रस्त्यावर राजेंद्र पवार यांच्या शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
हेही वाचा... संतापजनक... मेळघाटात आठ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके
पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल 4 लाख 82 हजार 186 रुपये किमतीची बनावट दारू, बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीटचे भरलेले ड्रम, बनावट दारूच्या बाटल्या, बाटल्या सील बंद करण्याचे मशीन, दारूचे प्रमाण मोजण्याची तापमापी, सेंटच्या बाटल्या, रंगाच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्यांचा साठा, बनावट दारू ठेवण्यासाठी केलेले बनावट खोके तसेच एक मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी विशाल विनायक वाघ (रा. कृषीनगर, संगमा चौक, धुळे) हर्षद बळवंत सूर्यवंशी (रा. शिवकॉलनी, अभय कॉलेजजवळ, धुळे) आणि रवींद्र धना पवार (रा. आनंद खेडा) या तीन जणांना ताब्यात घेतले आहे.