धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर शहादा फाटा येथून एका छोटा हत्ती वाहन तसेच बोलेरो पिकअप वाहनातून गांजा (अंमली पदार्थ) ची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती शिरपूर शहर पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करीत ५२ किलोग्राम गांजासह ९ लाख ५० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत चार तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या कारवाईत त्यात छोटा हत्ती क्रमांक एम.एच.४८ बी.एम.५४३२ व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच.०४ ई.बी. ३६०० या वाहनांमध्ये गांजा (अंमली पदार्थ) सापडला.
गांजाची चोरटी विक्री करण्यासाठी आलेली दोन्ही वाहने मुंबई-आग्रा महामार्गावर शहादा फाटा येथे आढळून आली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी शहादा फाटा येथे पोलीस पथकासह पावणेसहा वाजेच्या सुमारास सापळा रचला. ही वाहने ताब्यात घेत तपासणी केली असता, वाहनात सुमारे ५२ किलोग्रॅम गांजा आढळून आला. या कारवाईत सुमारे ५२ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने असा ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत,अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय सागर आहेर,हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील, पंकज पाटील, महेंद्र सपकाळ, नरेंद्र शिंदे, सनी सरदार, मुजाहिद शेख, प्रविण गोसावी, योगेश कोळी यांच्या पथकाने केली आहे.