धुळे - शहराचे आमदार डॉ. फारुख शहा यांनी धुळ्याच्या एमआयडीसीमध्ये असलेल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आमदार निधीतून ऑक्सीजन प्लांटसाठी 80 लाख रुपये तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 20 लाख रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले.
धुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा आणि रेमडीसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन, धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शहा यांनी धुळे शहरातील एमआयडीसीमध्ये असलेल्या स्वतःच्या मालकीची दहा हजार स्क्वेअर फूट असलेली जागा ही दोन वर्षासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.
तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणी कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी तर रेमडीसिविर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ लक्षात घेता 20 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी आज जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन सदर आशयाचे पत्र त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच कोरोना काळात अजून काही निधी लागल्यास मी नक्कीच प्रशासनाला वेळोवेळी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.