धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये अवैधपणे अमली पदार्थांची साठवण करून इतर जिल्ह्यांमध्ये विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शिरपूर शहरात पोलिसांनी एका ट्रकमध्ये ठेवलेला 7 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
शिरपूर शहरात शनी मंदिराच्या पाठीमागे दीपक बाबूलाल कुरे, पप्पू ढापसे, सतीश मोरे, शिरपूर यांनी पिंटू शिरसाठ नामक व्यक्तीच्या आयशर ट्रकमध्ये अमली पदार्थांचा साठा केला असून त्याची चोरटी विक्री केली जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक पाठवून तपासणी करण्यात आली.
यावेळी पोलिसांना आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात भांगेच्या गोण्या आढळून आल्या. त्यांची बाजारातील किंमत 7 लाख 20 हजार रुपये आहे. चार लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण 11 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास करून संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याचे काम शिरपूर पोलीस ठाण्यात सध्या सुरू आहे.