धुळे - शहरातील पांझरा नदी पात्रातून काढण्यात आलेला कचरा माजी आमदार अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ टाकला. यावरून रविवारी गोटे आणि महापौर चंद्रकांत सोनार यांच्यात चांगलाच वाद झाला. या दोघांच्या भांडणात धुळेकर नागरिकांचा राजकीय बळी दिला जात असल्याची चर्चा धुळेकर नागरिकांमध्ये सुरू होती. तसेच आमदार गोटे यांनी या विषयी आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा मनपासह सत्ताधारी भाजपला दिला आहे.
हेही वाचा - धुळ्यातील पांझरा नदीला आलेला पूर गिरीश महाजनांच्या आदेशामुळे; अनिल गोटेंचा आरोप
काही दिवसापूर्वी पांझरा नदीला पूर आला होता. पूर ओसारल्याने धुळे मनपा व भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांपासून नदी पात्रात स्वछता मोहीम सुरू होती. परंतु नदी पात्रात उरलेला कचरा हा माजी आमदार यांच्या कार्यकर्त्याना दिसला. त्यांनी तो कचरा नवीन मनपाच्या प्रवेशद्वारा समोर टाकून मनपाचा निषेध केला. ही वार्ता महापौर चंद्रकांत सोनार यांना समजल्यावर त्यांनी त्वरित टाकलेला कचरा हा मनपाच्या कर्मचाऱ्यांमार्फत उचलला आणि तोच कचरा माजी आमदार गोटे यांच्या घरासमोर टाकण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. गल्ली नं 4 येथे माजी आमदार गोटे यांच्या निवासस्थान समोर कचरा टाकण्यासाठी कार्यकर्ते पोहचले. मात्र गोटे हे घरातून बाहेर आले व कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला. तसेच माजी आमदार गोटे, नगरसेविका हेमा गोटे यांचे व भाजपा नगरसेवक व महापौर यांच्या कार्यकर्ते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
यावेळी गोटेंनी तीव्र विरोध केला. प्रसंगी माजी आमदार गोटे व नगरसेविका गोटे यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. मनपाच्या व सत्ताधारी भाजपचा निषेधही व्यक्त केला. दुसरीकडे महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अनिल गोटे हे जेष्ठ आहेत. त्यांना हे शोभत नाही. ते रिकामे उद्योग करतात. धुळ्यात रिकाम्या लोकांची कमी नाही, अशी टीका त्यांनी गोटे यांच्यावर केली. या दोघांच्या भांडणात धुळेकर नागरिकांचा राजकीय बळी दिला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र माजी आमदार गोटे यांनी या विषयी आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा मनपासह सत्ताधारी भाजपला दिला आहे.