धुळे - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजपची युतीचे काय आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि शिवसेनेकडून नेमकी कोणाला उमेदवारी असेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. यातही धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात हे पाहवे लागेल. मात्र अनिल गोटे हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरेतून सरकारची कामगिरी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक घडामोडी होण्याची शक्यता आहे. धुळे शहराच्या जागेवर भाजपचा दावा असताना आता या जागेवरून माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मुंबईत याविषयीची खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास भाजपच्या अनेक इच्छुकांना आपल्या इच्छांना आवर घालावा लागेल. आमदार गोटे यांची लोकप्रियता आणि त्यांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरेंपर्यंत असलेले जिव्हाळ्याचे संबध यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. शिवसेनेला आपले अस्तित्व सिद्ध करण्याची ही नामी संधी असून महापालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेला अनिल गोटे हवे असल्याची जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा... माझ्यासोबत दादांची चर्चा झाली, राजकारणातून संन्यास घेणार नाहीत - पार्थ पवार
15 वर्ष धुळे शहर विधानसभेचे आमदार राहिलेले अनिल गोटे यांना शहराच्या समस्यांचा, प्रश्नांचा अभ्यास आहे. याशिवाय भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांना स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तसेच सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. या सर्व बाबी पाहता गोटे सेनेकडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात या चर्चेला वेग आला असून अर्ज सादर करतानाच, वास्तव गुपित काय आहे? ते उघड होणार आहे.