धुळे : शहरातील मोगलाई भागात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी मूर्तीची विटंबना केल्याची घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. संतप्त नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. विविध जाती-धर्माची संमिश्र वस्ती असलेल्या मोगलाईत तणावपूर्ण शांतता आहे. सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांना शांततेचे केले आवाहन : धुळे शहरात साक्री रोडवरील मोगलाई भागात ही घटना घडली आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नागरिकांच्या भावना अतीशय तीव्र झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह शहर पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बंदोबस्त तैनात केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
राजकीय पुढाऱ्यांची धाव : या घटनेची माहिती मिळतात विविध राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, नगरसेवक सुनील बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, शिवसेनेचे मनोज मोरे, संजय वाल्हे, महेश मिस्तरी, अॅड. रोहित चांदोळे, प्रशांत मोराणकर, डॉ. योगेश पाटील, राकेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक नाना वाडीले, राजेंद्र वाडीले, छोटू वाडीले, विठोबा वाडीले, सुरेश जावरे, कमलबाई जावरे, रंजनाबाई वाडीले, हिराबाई वाडीले, सरलाबाई वाडीले, मंगलाबाई वाडीले, आशाबाई वाडीले, मीराबाई वाडीले, प्रमिलाबाई वाडीले आदींनी समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
मोगलाई भागात समाजकंटकांनी एका धार्मिक स्थळी मूर्तीची विटंबना केली. नागरिकांच्या भावना अतीशय तीव्र असल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. - पोलीस अधीक्षक संजय बारकुंड
महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या : या घटनेनंतर नागरिकांसह महिलांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत समाजकंटकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला. त्यावेळी त्वरित आरोपींना अटक करण्यात येईल असे, आश्वासन सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिले. तसेच पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेराची वायर काढल्याचे निदर्शनास आले.
एसपींचे आवाहन : पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मोगलाई भागातील एका धार्मिक स्थळी मूर्तीची विटंबना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. त्यामुळे शांतता प्रस्थापित झाली. दरम्यान, धुळे शहर पोलीस ठाण्यात तीन संशयिता विरूध्द गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. मोगलाई भागातील शिवसेनेचे पदाधिकारी भिलेश खेडकर या गुन्ह्यांत फिर्यादी आहे.
हेही वाचा -