धुळे- शिरपूर येथील रसायनाच्या कारखान्यात भीषण स्फट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अजूनही काही जणांचे मृतदेह कॉटेज रुग्णालयात आणण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून मृतांची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
दुपारी ३ वाजेपर्यंत १३ जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयाने हा आकडा जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर मृतदेह आणणे सुरूच असल्याने अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. आतापर्यंत केवळ दोन जणांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आले आहे. मात्र, त्यांची नावे कळू शकली नाहीत.
शिरपुरातील कॉटेज रुग्णालयात शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने शक्य ती मदत करत आहे. या घटनेनंतर शिरपूरसह धुळे, चोपडा, साक्री, नंदुरबार, शिंदखेडा, दोंडाईचा येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. त्याचप्रमाणे रुग्णवाहिका देखील वेगवेगळ्या ठिकाणांहून मागविण्यात आल्या होत्या.