धुळे - साक्री तालुक्यातील समोडे गावात एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. परंतु, गावातील कोणीच मदतीला आले नाही तर अंत्यविधीसाठी नेण्याकरिता वाहनदेखील उपलब्ध न झाल्याने मृतदेह अक्षरशः जड अंतकरणाने नातेवाईकांना कचरा गाडीतून न्यावा लागला. यावर मृताच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
समोडे गावात एका 70 वर्षीय व्यक्तीचा रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा कुठलेही वाहन मिळाले नाही. प्रशासनाच्या वतीने कुटुंबाला वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीतून शेवटी मृतदेह स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार करावा लागला.
वाहनाची 10 तास पाहिली वाट
मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी वाहन मिळवण्याच्या प्रयत्नात 10 तास गेले. मृताचे नातेवाईक रात्रीपासून रुग्णवाहिका किंवा इतर वाहन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, कोणतेही वाहन मिळू शकले नाही. ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका येत आहे, 2 तास थांबा नंतर 5 तास थांबा, असे करत 10 तास लोटले गेले. मात्र, कोणतेही वाहन मिळत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी कचरा गाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
माणुसकी हरपली?
कोरोनामुळे माणुसकीसुद्धा हरपल्याचे दिसून आले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कार्यात मदतीसाठी गावातील कोणीच आले नाही. त्यांना रुग्णवाहिकेसह एखादे वाहनदेखील उपलब्ध झाले नाही. शेवटी नाईलाजास्तव मृतदेह काचारा गाडीतून न्यावा लागला. मृतदेहाची अवहेलना होणे अतिशय वेदनादायी आहे. याला सर्वस्वी प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही. सध्या यंत्रणेवर ताण प्रचंड आहे. मात्र, अशा स्थितीत मृतदेहाची अशी अवहेलना होणार नाही, याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. गावांमध्ये पर्यायी साधने विकसित करणे गरजेचे आहे. मात्र, याच्या-त्याच्यावर टोलवाटोलवी करून स्थानिक प्रशासनाने मोकळे होऊ नये.
नातेवाईकांची मागणी
कोरोनामुळे रुग्णांचे होणारे हाल हा आता चर्चेचा विषय असला तरी त्यानंतर होणारा मृत्यू हा अधिक वेदनादायी आहे. मृतदेहांची अशी अवहेलना थांबली पाहिजे, यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन पावले उचलणे गरजेचे आहे. नातेवाईकांसह गावकऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या..
धावत्या हावडा एक्सप्रेसला धडकला ट्रक; पाहा व्हिडिओ
फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसीचा तुटवडा जाणवला नसता -उदयनराजे
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; पोलीस महासंचालक संजय पांडे करणार चौकशी
मुंबई: उद्या सार्वजनिक वाहतूक सुरू; अनावश्यक कारणाने प्रवास केल्यास होणार कारवाई
मुंबई: प्रवास करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे; रिक्षाचालकासह मित्राला अटक