धुळे - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज तहसीलदार कार्यालयजवळ, धुळे ग्रामीण, आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ठोसर यांना राष्ट्रपतींच्या नावे शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातून विचारले सवाल
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ यावेळी निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणाऱ्या नेत्यांचे डोके ठिकाणावर आहे का? हे पंजाबच्या, हरयाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, देशातील शेतकऱ्यांचे आहे. शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहेत का? पोलीस बळाचा वापर का? शेतकरी न्याय मागतोय. तीन विधेयके मंजूर केली, त्याचा परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यासोबत चर्चा न करता ही विधेयके का लादली? शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही, असे सवाल या निवेदनातून विचारण्यात आले आहेत.
भाजपाचा निषेध
केंद्रातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या आंदोलनात धुळे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षांसह काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.