धुळे- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात दुर्मिळ पुस्तके तसेच संदर्भग्रंथ इंटरनेटवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. यामुळे पुस्तक खरेदी करण्याकडे वाचकांचा कल कमी झाला आहे. त्याचा पुस्तक विक्रीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होऊन या व्यवसायावर मंदीचे सावट आले असल्याचे पुस्तक विक्रेते प्रशांत निकम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा- राजर्षी शाहू महाराज भारतरत्न पेक्षा मोठे - संभाजीराजे छत्रपती
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रशांत निकम गेल्या 20 ते 22 वर्षांपासून पुस्तक विक्रीचा व्यवसाय करतात. निकम हे उच्चशिक्षित आहेत. निकम यांच्याकडे शासकीय मुद्रणालयाची अधिकृत एजन्सी असून त्यांच्याकडे विविध शासकीय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके आहेत. तसेच अनेक दुर्मिळ ग्रंथ देखील त्यांच्याकडे विक्रीसाठी आहेत.
'आज अनेक पुस्तकांच्या पीडीएफ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. काही ई-पुस्तकेही आहेत. यामुळे हातात पुस्तके घेऊन वाचणारा वर्ग कमी राहिला आहे. परिणामी आमच्या पुस्तकांची विक्री घटली आहे. येणाऱ्या काळात यात अजून घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे' अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.